
कात्रज,पुणे: (जयदीप निंबाळकर)
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याच्या अस्तित्वासाठी औरंगजेबाशी प्रखर लढा देणाऱ्या मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी, कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडीतील सरहद ग्लोबल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे नामकरण ‘स्वराज्य सौदामिनी मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणी पथ’ असे करण्यात आले.
सरहद संस्थेच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मा. सुरेश भाऊ कदम यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी भूषविले होते.
महाराणी ताराराणींचे कर्तृत्व दुर्लक्षित होत असल्याची खंत – डॉ. जयसिंगराव पवार
अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ही खंत व्यक्त करताना पुढे सांगितले की “इतिहासात महाराणी ताराराणी हे एक दुर्लक्षित पान राहिले आहे. प्रत्यक्षात औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला ज्या मातीत शेवटचा श्वास घ्यावा लागला, त्यामागे ताराराणींचे अदभुत शौर्य होते. त्यांचा लढा सत्तेसाठी नव्हता तर हिंदवी स्वराज्यासाठी होता. अशा महान धुरंदर योद्धा राणीचे नाव रस्त्याला देणे आणि त्यांच्या नावे मुलींची सैनिकी शाळा सुरू करणे, ही भविष्यात मुलींना प्रेरणा देणारी कृती आहे.” पन्हाळा गडावर महाराणी ताराराणींचा पुतळा उभा करणे हे माझे स्वप्न असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यासाठी स्थानिक जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सुरेश भाऊ कदम
नामकरण सोहळ्यानंतर बोलताना सांगितले, “स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या महाराणींच्या स्मृती जिवंत ठेवणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक जनतेचा नेहमीच पाठिंबा राहील. माझ्या हस्ते हे नामकरण होणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे.”
सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचे नेतृत्व शिवश्री शिवभक्त मयूर मसुरकर करणार आहेत.
या नामकरण सोहळ्याला लेखिका वसुधा जयसिंगराव पवार, डॉ. मंजुश्री पवार, सामाजिक कार्यकर्ते महेश कदम, मनीषा वाडेकर, लेशपाल जवळगे, मुख्याध्यापिका निर्मला नलावडे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला रांजणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मयूर मसुरकर यांनी केले.
