
कात्रज येथे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
कात्रज, ता. २२: कात्रज येथील श्री काळभैरवनाथ नाभिक संघटना व सहयोग फाउंडेशन, कात्रज यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. आगम मंदिर पायथा येथील काशी विश्वेश्वर मंदिर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संतसेना महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संतसेना महाराजांच्या संत साहित्य व सामाजिक प्रबोधनातील योगदानावर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे स्व. मायाताई भगवान शिंदे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘संतसेना महाराज पुरस्कार २०२५’ पत्रकार अशोक गव्हाणे यांना प्रदान करण्यात आला. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमात ह.भ.प. सद्गुरु कन्या स्वाती ताई खोपकर (धनकवडी, पुणे) यांनी प्रवचन सेवा दिली. त्यांनी संतसेना महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेश उपस्थितांना दिला. या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, युवराज बेलदरे, प्रभाकर कदम, विकास फाटे, सुधीर कोंढरे, डॉ. सुचेता भालेराव, अविनाश पवार, स्वराज बाबर, महेश किवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान शिंदे यांनी केले. त्यांनी नाभिक संघटनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भगवान शिंदे, अमोल दळवी, दीपक सोनवणे, संदीप ननावरे आदींसह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
———-
