पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, दक्षिण पुण्यातील राजकारण आता पूर्णपणे तापले आहे. ‘दक्षिण पुण्याचा अभेद्य सह्याद्री’ आणि ‘विकासाचा महामेरू’ अशी ओळख असलेले माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे यांनी प्रभाग क्रमांक ३८ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ‘घड्याळ’ चिन्हावर आपली उमेदवारी जाहीर करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
उच्चशिक्षित व्यक्तिमत्व लाभलेले दत्ताभाऊ धनकवडे यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्यत्वापासून सुरू झाली. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी नगरसेवक ते पुणे महानगरपालिकेचे महापौर पद भूषवले आहे. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या दत्ताभाऊंनी आपल्या कार्यकाळात सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपूल, अत्याधुनिक रुग्णालये, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा यांसारखी महत्त्वाची कामे स्वबळावर मार्गी लावली आहेत.
काही काळापूर्वी बालाजीनगरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, दत्ताभाऊंनी स्वतः पुढाकार घेऊन स्थानिक गुन्हेगारी मोडीत काढली आणि सर्वसामान्यांसाठी शांत व सुरक्षित बालाजीनगर पुन्हा उभे केले. त्यांच्या याच विकासकामांच्या जोरावर, मतदारसंघाची वारंवार पुनर्रचना होऊनही, ते प्रत्येक वेळी मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत.
यावेळेस प्रभाग ३८ ची व्याप्ती मोठी असून यात बालाजीनगरसह कात्रज घाट, जांभूळवाडी, आंबेगाव पठार, आंबेगाव खुर्द आणि धबाडी या नव्या भागांचा समावेश झाला आहे. या नवीन भागांत मूलभूत सुविधांची मोठी कमतरता आहे. या भागांचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेला भरघोस निधी खेचून आणण्याची क्षमता केवळ दत्ताभाऊंसारख्या अनुभवी नेतृत्वाकडे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
दत्ताभाऊंसोबत यंदा अतिशय तगडे पॅनेल मैदानात आहे. यामध्ये माजी नगरसेवक प्रकाशभाऊ कदम (कात्रज परिसर), माजी नगरसेविका स्मिताताई कोंढरे (दत्तनगर-जांभूळवाडी), सीमाताई युवराज बेलदरे (आंबेगाव-दत्तनगर) आणि सारिकाताई फाटे (कात्रज-दक्षिण भाग) यांचा समावेश आहे. या पाचही उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा भक्कम पाठिंबा यामुळे या पॅनेलने सध्या प्रचारात मुसंडी मारली असून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
सद्गुरु श्री शंकर महाराज मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बालाजीनगर ते कात्रजपर्यंत निघालेली भव्य रॅली आणि गंधर्व लॉन्स येथील प्रचंड सभेने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. ठिकठिकाणी महिला भगिनींकडून दत्ताभाऊंचे औक्षण करून स्वागत केले जात आहे. सुरुवातीला ही निवडणूक चुरशीची वाटत असली, तरी सध्या मतदारांचा कल स्पष्टपणे राष्ट्रवादीच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे.
