दक्षिण पुण्यात कार्यसिद्धी प्रतिष्ठान आयोजित आरोग्याचा महायज्ञ

धनकवडी-:: आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने धनकवडी येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरिराज तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून हे भव्य शिबिर महानगरपालिका मैदान, मोहननगर, धनकवडी येथे भरविण्यात आले आहे.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५ हजारांहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. दोन दिवसीय या शिबिरात पुणे, मुंबई आणि नाशिक येथील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे आद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी तपासणी, तसेच सर्वच विभागांतील समग्र आरोग्यसेवा हे आहे. आज दुपारी सुमारे १२ वाजता या शिबिराचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री व विधानसभेचे सदस्य प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते, तसेच चिंचवड विधानसभा सदस्य शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सावंत म्हणाले, आरोग्य क्षेत्रात मंत्री म्हणून काम करताना अनेक योजना राबविल्या, परंतु समाजाशी निगडित अशा लोकहितकारी उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणे ही खरी लोकसेवा आहे. नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा उपक्रमांद्वारे लोकांना आरोग्याचा लाभ द्यावा. यावेळी माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक विजय रेणूसे, विशाल तांबे, किशोर उर्फ बाळा धनकवडे, अभिजीत कदम, आप्पा परांडे, श्रद्धा परांडे, शंकर कडू, कमल व्यवहारे, दिगंबर डवरी, मिलिंद पन्हाळकर, रेऊ गाडेकर, रावसाहेब कुंजीर उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग, डोळे, दंत, हाडे, मधुमेह, रक्तदाब, स्त्रीरोग, त्वचारोग, कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी अशा विविध विभागांतील मोफत सेवा दिल्या जात आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भपत्रे व सल्लाही देण्यात येत आहे. दक्षिण पुणे परिसरातील नागरिकांनी या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आरोग्य जनजागृतीचा संदेश पुढे नेला असून, सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा आरोग्याचा महायज्ञ सर्वार्थाने यशस्वी ठरत असल्याचे मत गिरिराज सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय घोळवे यांनी तर मान्यवरांचे व नागरिकांचे आभार कुमार पाटील यांनी मानले.
