किल्ले राजगडावर धाडसी बचावकार्य! माकडाकडून दगड पडून जखमी झालेल्या मुंबईच्या महिलेला ३० मिनिटांत वाचवले!

मुंबईहून आलेल्या २० महिलांच्या ग्रुपमधील एक ३८ वर्षीय महिला, वर्षा हुंडारी, बालेकिल्ल्याखाली चालत असताना ही दुर्घटना घडली. किल्ल्यावर खेळणाऱ्या माकडांकडून चुकून एक दगड खाली पडला आणि तो थेट महिलेच्या डोक्यात लागला. डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्याने परिस्थिती गंभीर बनली.
संस्थेच्या पर्यटक व्यवस्थापन उपक्रमांतर्गत कार्यरत असलेले किल्ल्यावरील पहारेकरी विशाल पिलावरे, बापू साबळे, आणि दादु वेगरे यांनी प्रसंगावधान दाखवले. कोणताही वेळ न दवडता, स्थानिक मुलांच्या मदतीने त्यांनी तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली. राजगडसारख्या उंच आणि अवघड किल्ल्यावरून जखमी व्यक्तीला खाली आणणे हे मोठे आव्हान होते.
परंतु, या टीमने आपल्या जीवाची बाजी लावून, अवघ्या ३० मिनिटांच्या विक्रमी वेळेत महिलेला किल्ल्याखाली आणले. खाली आणल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी तातडीने एका खासगी गाडीतून रुग्णालयात पाठवण्यात आले.
संस्थेने या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेबद्दल आणि दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ऐतिहासिक स्थळांची देखभाल करण्यासोबतच, पर्यटक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलेला वेळेत उपचार मिळून तिचे प्राण वाचले
