धनकवडी ची ग्रामदेवता श्री जानुबाई देवी ची यात्रा उत्साहात पार पडली.
जानुबाई देविदेवस्थान ट्रस्ट तर्फे यात्रेनिमित्त ग्रामदैवत जानुबाई मंदिराला विविध रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात देखील विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. सालाबाद प्रमाणे पान -फुलाचा कार्यक्रम पार पडला. पहाटे देवीची अभिषेक, पूजा ,आरती ह भ प माऊली जंगले महाराज यांचे हस्ते झाली. त्यानंतर भाविक भक्तासाठी दर्शनवारी सुरू झाली. परंपरेनुसार सायंकाळी आरतीनंतर देवीची पालखी मंदिरापासून पालखी मार्गाने जयनाथ मित्र मंडळाच्या ढोल झांजपथकाच्या निनादात गावठाणातून काढण्यात आली. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. ठिकठिकाणी पालखीचे औक्षण करण्यात आले. हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. पालखीमध्ये जानुबाई देवी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष भगवान खेडेकर, उपाध्यक्ष रवींद्र धनकवडे यांच्यासह ट्रस्ट चे विश्वस्त, आणि आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे ,वर्षा तापकीर, शांताराम धनकवडे, मिलिंद पन्हाळकर यांच्यासह पालखीचे मानकरी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

