कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजित अबॅकस व वैदिक गणित उन्हाळी शिकवणीवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व बक्षीस वितरण उत्साहात
– नवी गुणवंत पिढी हे राष्ट्र अधिक बळकट करेल – गिरीराज सावंत
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या वापरामुळे प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. कामाचे स्वरूप बदलत आहे. पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रही या बदलांना अपवाद ठरणार नाही. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उद्याच्या जगात मोठी उलथापालथ होणार असल्याचे ठाम मत ज्येष्ठ लेखक, विचारवंत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्यावतीने व एस सी मास अॅकॅडमीच्या सहाय्याने आयोजित अबॅकस व वैदिक गणित मोफत शिकवणीवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. ‘माझा लेखन प्रवास व कृत्रिम बुध्दिमत्ता’ या विषयावर त्यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व नागरिकांसमोर सविस्तर विवेंचन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज तानाजीराव सावंत हे होते, तर व्यासपीठावर एस सी मास अॅकॅडमीच्या संचालिका सुजाता हलवाई, राजेश्वरीताई सावंत, अनंतराजे शिर्के, अॅड. दिलीप जगताप, राजेंद्र घाडगे, अश्विनीताई जाधव आदी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. आपल्या व्याख्यानात अच्युत गोडबोले म्हणाले, की माणसाला पडणारे प्रश्न आणि त्यावर शोधलेली उत्तरे माणसाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा घटक आहेत. माणसाने कल्पनाशक्तीच्या बळावर स्वत:च्या सुखासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या. प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण स्वत:च्याच मेंदूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्याची जगण्याची पद्धत आणि व्यवस्था नव्या जगात कालबाह्य ठरेल. येणारा काळ हा कल्पनेपेक्षाही अधिक वेगवान असेल. ‘एआय’मुळे सर्वच व्यवसाय आणि रोजगाराचे स्वरूप बदलणार असून, नवीन बदल, तंत्रज्ञान आत्मसात करणे सर्वच वयोगटांना अनिवार्य ठरेल. अनेक क्षेत्रांत रोजच्या कामाची जागा ‘एआय’ घेईल. या बदलांना आत्मसात करून घ्यावे लागेल. हे बदल स्वीकारले नाहीत, तर काही कंपन्या कालबाह्य झाल्या, तशी माणसेही कालबाह्य होतील. ‘एआय’ सद्यस्थितीत मध्यस्थ म्हणून काम करत आहे. मात्र, येत्या काळात स्वतःहून विचार करायला लागले, निर्णय घ्यायला लागले, त्यामध्ये भावनिक स्पर्श निर्माण झाला, तर नव्या स्वरूपाची आव्हाने उभी राहतील, असा धोक्याचा इशाराही अच्युत गोडबोले यांनी याप्रसंगी दिली.
तर, याप्रसंगी कार्यसिद्धीचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत म्हणाले, की आजची नवी पिढी गुणवान व मेहनती आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या युगाची आव्हाने ती यशस्वीरित्या व समर्थपणे पेलेल. उलट ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही पिढी राष्ट्राला अधिक बळकट करेल. या पिढीच्या माध्यमातून आपले राष्ट्र आणखी वेगाने प्रगतीची भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही याप्रसंगी गिरीराज सावंत यांनी व्यक्त करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी राजेश्वरीताई सावंत, अॅड. दिलीप जगताप यांनीही उपस्थितांना संबोधित करून कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमार पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून रूपरेषा श्रीकांत चौधरी यांनी विषद केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होते.
कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजित व एस सी मास अॅकॅडमीच्या सहाय्याने घेण्यात आलेले हे उन्हाळी शिकवणीवर्ग वंडरसिटी हॉल व शरदचंद्र पवार बहुउद्देशिय हॉल कात्रज पुणे येथे पार पडले होते. या शिकवणीवर्गातून वंडरसिटी येथील कॅम्पमध्ये अभिग्या पंकज कलिता हिने प्रथम तर राजवीर अभिजित पाटील याने द्वितीय क्रमांक पटकाविला. काव्या अतुल बेलोकर तृतीय, काव्या मारूती साळुंके चतुर्थ, अंशुली अजित खैरे पाचवी तर कनिश संजय वर्मा याने सहावा क्रमांक पटकावला. तसेच, शरदचंद्र बहुउद्देशीय हॉल येथील कॅम्पमधून आरोही अनिकेत घुले प्रथम, मानस देवेंद्र मालेकर द्वितीय, आदित्य महेंद्र दानावाले तृतीय, रूद्र पी जगताप चतुर्थ तर ईश्वरी मोरे हिने पाचवा क्रमांक पटकाविला. या सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींसह अबॅकस व वैदिक गणितातील गुणवंत व प्राविण्यप्राप्त विद्यार्थी, विद्यार्थिनींना अच्युत गोडबोले, गिरीराज सावंत यांच्याहस्ते मेडल, प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, उन्हाळी वर्गास उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
संपादक बजरंग निंबाळकर
