पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी, लॉ कॉलेज रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेल्या स्मारकावरील सूचना फलकावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आणि त्याच्या पत्नीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तक्रारदार नयनाथ तुकाराम अमराळे, वय 23 वर्ष, यांनी दिलेल्या जबाबानुसार, आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचा मित्र अभिजीत सितापुरे नवले ब्रिजवरून परतत असताना शिवसृष्टीच्या मुख्य गेटसमोर दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे दिसले. यावेळी एका राखाडी रंगाच्या अल्टो के10 (क्र. एमएच 12 पीसी 1035) गाडीजवळ एक वयस्कर व्यक्ती सूचना फलकावर लघुशंका करताना दिसली, तर एक महिला मोबाइल हातात घेऊन शेजारी उभी होती. ही घटना अक्षय गायकवाड यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली.
तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी याबाबत विचारणा केली असता, सदर व्यक्तीने आपले नाव अमोल अरुण कुलकर्णी (वय 59, खासगी नोकरी, रा. धायरी, पुणे) आणि गाडीत बसलेली महिला त्यांची पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय 57) असल्याचे सांगितले. त्यांनी उर्मटपणे “काय करायचे ते करा” असे उत्तर दिले. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि दोघांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले.
