कात्रज-: मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका स्टेट एजंटचा दोन नराधमांनी खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (9 मे) रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे घडली आहे. मृत व्यक्ती हा घरी जात असताना आरोपींनी त्याला गाठून त्याचा खून केला आहे. खून करणारे आरोपी हे काका पुतण्या असल्याची माहिती आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ येथे गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असल्याची माहिती आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेव्हणीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा, नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरु केला होता. मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध होता. यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहरला पुण्याच्या पवारनगर येथे गाठले.
तेथे ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर आधी त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करण्यात आली. बांबूचा वार डोक्यावर वर्मी लागल्याने मनोहरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली. यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीडे येथील गेवराई येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

