जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपी २४ तासात जेरबंद -आंबेगाव पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी.

कात्रज: घटनेबाबत माहिती याप्रमाणे फिर्यादी अभिजीत विष्णु पवार यांचा येडशी येथे श्री.गणेश ट्रेडर्स नावाने येडशी (धाराशिव) येथे व्यवसाय असुन ते पुण्यामध्ये दिनांक १५/०७/२०२५ रोजी पुरवलेल्या मालाचे पैसे घेण्याकरीता आले होते. त्यांच्याकडे एकुण ४० लाख रुपये रोख रक्कम बॅगमध्ये ठेवलेली होती. व ते एक्सेला प्लाझा बिल्डींग, बाबजी पेट्रोलपंप आंबेगाव, पुणे येथे मालाच्या बिलाच्या बाबत माहिती घेण्यासाठी जात असताना पैशाची बॅग त्यांचा मित्र मंगेश ढोणे यांच्याकडे दिली होती.
ते दोघे बाबजी पेट्रोलपंपा जवळील कंपनीच्या ऑफिसकडे पायी चालत जात असतानाच काळया रंगाची महिंद्रा थार गाडी त्यांच्या जवळ येवुन थांबली. त्या गाडीमधुन दोन इसम खाली उतरले व त्यांनी मंगेश ढोणेच्या खांदयावरील बॅग हिसकावुन घेतली. अभिजीत पवार यांनी गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने त्यांच्या तोंडावरती ठोसा मारून खाली पाडले. व तिघे त्या काळया रंगाच्या चारचाकी गाडीमधुन येवुन पैशाची बॅग घेवुन पळून गेले.
घटनेबाबत अभिजीत पवार यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गु.र.नं.१५८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन गुन्हयाचा तपास गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आंबेगाव पो.स्टे. हे करीत आहेत.
आरोपीनी गुन्हयात वापरलेल्या वाहनाचा क्रमांक एमएच १२ डब्लुई ००८५ असा निष्पन्न झाल्याने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तसेच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपी प्रदिप रामदास डोईफोडे (रा. भुगाव, पुणे) मंगेश दिलीप ढोणे (रा.येडशी, जि.धाराशिव) व एक विधीसंघर्षीत बालक यांना खंडोबा मंदिर रोड, भुगाव, पुणे येथुन ताब्यात घेत त्यांच्याकडुन पाच मोबाईल हॅन्डसेट, ९,३५,५००/- रुपये रोख रक्कम, एक काळया रंगाची थार गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
फिर्यादीचा मित्र मंगेश ढोणे यानेच प्रदिप रामदास डोईफोडे व विधीसंघर्षीत बालक यांना बातमी देवुन त्यांचे सोबत संगणमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरचा तपास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २- मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि.
श्री विजय कुंभार (खंडणी विरोधी पथक-२, पुणे शहर,). व.पो.नि. अंजुम बागवान (गुन्हे शाखा, युनिट-२) तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, गुन्हे शाखा युनिट २ चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री अमोल रसाळ, अशिष कवठेकर, आंबेगाव पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, स.पो.फौ. शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार गणेश दुधाने, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, पोलीस अंमलदार आबासो खाडे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवा पाटोळे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, राजेश टेकावडे, हरिष गायकवाड तसेच अवदुत जमदाडे पोउआ परि-०२ कार्यालय पुणे शहर व गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार ओंकार कुंभार, अमोल सरडे व पवन भोसले यांनी केली आहे.
